आशा

या आकाशातून साऱ्या
रक्तपात माजला होता
सरणावर निजण्यासाठी
भास्कर तो सजला होता

शेकडो मशालींचा ज्याने
संसार थाटला होता
अग्निस तया जाण्याचा
तो थाटच आगळा होता

आजीव हा सारा इथला
काळोखात जो सजला होता
तारकारुपी दुःखाचा, नयनी
अश्रू तो दाटत होता

मिटून लोचन सारे, तो
आसमंत निजला होता
विझवुन मशाली साऱ्या
भास्कर ही मिटला होता

तेवढ्यात तिकडे काजवा
आरास ही सजवत होता
त्या टिंब टिंब दिव्यांनी
प्रकाशित आसमंत होता

कालांतराने तो साऱ्या
मिणमिणत्या विझवत होता
पहाटेचा हा अंधुक वारा
प्रकाश पसरवीत होता

-नियाज मुलाणी

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started