
हे कृष्णनभा तू भेटी येशी
शब्द थोडके धाडून नेशी
हृदय माझे ते दूर देशील
थिजले, त्यांना स्पंदन देशी
स्पंदनांत तू सांग कुशल मी
मंगल माझे भावगीत ही
शुष्क, निरस प्रांती मी असलो
आठवात शोधली सुखे ती
त्यांचे मंगल पाहून पाहून घे रे
सख्यासमवेत धाडून दे रे
उभा तो तिकडे प्रीतीपीपासू
अचल, अचलावरी अशी ओळख दे रे
पाहून घेशील स्मित ते अलगद
आहे का ओठांवर त्या रे
जर शक्य असेल तर मनात जाऊन
गुपित थोडीशी शोधून घे रे
शोक तिचे ते सदा अबोल रे
मनात ठेवी साठवून सारे
मुखावरी तरळेल हास्य ते
मानसी साठले क्लेश खेद रे
माझ्या ठायी स्थिरला शिशिर रे
वृक्षपर्णापरी भाव माझे रे
तिकडून तिचे गीत पोहोचता
दाटेल मानसी वसंत माझ्या रे
नियाज मुलाणी